तीन जहाल महिला नक्षलींना अटक

0
12

गडचिरोली,दि.२२(berartimes.com): गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांनी नुकतीच तीन जहाल महिला नक्षलींना अहेरी तालुक्यातील संड्रा गावाच्या जंगलातून अटक केली. मैनी उर्फ जिमो उंगा लाती(३२)रा.पालनार, जि.बिजापूर, सरिता उर्फ मुळे कट्टा मडकाम(२३)रा.कोठमेट्टा, जि.बिजापूर व पाकली उर्फ कारी बुधू गडे(२८)रा.दुप्पाळ, जि.बिजापूर(छत्तीसगड) अशी अटक केलेल्या नक्षलींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संड्रा जंगल परिसरात संयुक्तरित्या नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिला पळून जाताना दिसल्या. पाठलाग करुन पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्या जहाल नक्षली असल्याची माहिती मिळाली. मैनी लाती ही २००३ पासून संड्रा दलममध्ये कार्यरत आहे. सरिता मडकाम ही २०१३ पासून, तर पाकली उर्फ कारी गडे ही २०१२ पासून संड्रा दलममध्ये कार्यरत होती. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे भैया कुळसंगे, गंगाराम सिडाम व छत्तीसगड पोलिसांनी तिन्ही नक्षलींना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली.