जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविणार- अभिमन्यू काळे

0
15

गोंदिया,दि.२१(berartimes.com) : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढणे गरजेचे आहे. शुन्य माता व बाल मृत्यू अभियान, पशुपक्षांना जंगलात, शेतशिवारात त्यांचे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी शेताच्या बांधावर झाडे लावून त्याचे संगोपन करणे, यासह अनेक उपक्रम भविष्यात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात २१ एप्रिल रोजी अकराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे व आर.टी.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंब कॅशलेस व्यवहार करतील असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संबंधित शेतीविषयक विशेष ग्रामसभेला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे जमिनीविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यास हया ग्रामसभा उपयुक्त ठरल्या आहे. यामध्ये तलाठ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे गोरेगावचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना ई-फेरफार, इडिट मॉड्युल प्रणालीत १०० टक्के काम, महाराजस्व अभियानात विविध दाखल्यांचे वाटप, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे यांना सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन, रोजगार हमी योजनेतून हाजराफॉलच्या रस्त्याचे काम, पर्यटन वाढीच्या दृष्टीने होम स्टेसाठी पारंपारिक घरांचे फोटो संकलन, तिरोडा तहसिलदार श्री.चव्हाण यांना पारंपारिक घराचे फोटो संकलन, डासमुक्तीसाठी मॅजिक पीट बांधणे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे यांना रोजगार हमी योजनेच्या मजुरांना रोखरहीत मजुरी वाटप, या योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
तत्पूर्वी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सिव्हील सेवा दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील पडदयावर बघण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नागरी सेवा दिनानिमित्त संबोधीत केले. देशातील विविध राज्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.