निवृत्त कर्नलच्या घरावर छापा, 1 कोटी आणि विदेशी शस्त्रास्त्रांसह मांस जप्त

0
8

नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था)- महसूल गुप्तचर संचालनालया(DRI)च्या एका टीमनं मेरठच्या सिव्हिल लायन्स भागातून लष्कराचे माजी निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि त्यांचा मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोई यांच्या घरी गोपनीय सूचनेच्या आधारावर छापा मारला आहे.

या छापेमारीत निवृत्त कर्नलच्या घरातून जवळपास 1 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. तसेच जंगली जनावरांची चरबी, डोकं, शिंग असे अवयव सापडले असून, शूटिंगचे 40 रायफर्ल आणि पिस्तुलसहीत जवळपास 50 हजार काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तसेच दुर्लभ आणि बंदी असलेल्या वन्य जीवांचे 117 किलो मांस हस्तगत करण्यात आलं आहे. DRIच्या टीमनं सर्व वस्तू सील करून स्वतःसोबत नेल्या आहेत. नवी दिल्लीहून आलेल्या या टीमनं शनिवारी सकाळी 11.30 वाजता कारवाई सुरू केल्यानंतर ती रविवारी पहाटे 3.30 वाजता पूर्ण झाली. या छापेमारीत डीआरआयच्या टीमसोबत वन विभागाचे अधिकारी, पोलिसांची टीमही सहभागी झाली होती.

16 तास चाललेल्या कारवाईत डीआरआयच्या टीमला मोठे यश मिळाले आहे. निवृत्त कर्नलच्या घरातून सांभर, काळवीट, बिबट्याची कातडी, सांभराचे डोके, शिंग आणि इतर सामान जप्त केले आहे. महसूल गुप्तचर संचालनालया(DRI)ची टीम येण्याची खबर मिळताच निवृत्त कर्नल यांचा मुलगा फरार झाला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नल आणि त्याच्या मुलाच्या घरावर छापा टाकण्यात आला असून, विदेशी रायफल्स आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. तसेच रायफल्स आणि पिस्तुलांचे कुटुंबीयांकडे लायसन्स उपलब्ध नाही .