जम्मू-काश्मीर: राज्यपाल राजवटीवरून आरोप प्रत्यारोप

0
6

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत.विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत न मिळाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल एन.एन.व्होरा केली होती. त्यानंतर गुरुवारी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. या शिफारसीनंतर राज्यातील राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सला राज्यपाल राजवटीसाठी जबाबदार धरले आहे. तर दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवलेल्या भाजपने मात्र आम्ही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांसोबत चर्चा करत असल्याचा दावा केला आहे.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर टीका केली आहे. राज्यात गेल्या महिनाभर सरकार नाही, जनता मुफ्ती यांच्यासाठी वाट पाहू शकत नाही असे ओमर यांनी म्हटले आहे.
राज्यात महापूर येवून गेला आहे. त्या ठिकाणाचे पुनर्वसनाच्या कामासाठी सरकारची गरज असल्याचे ओमर यांनी म्हटले आहे. राज्यात पुन्हा निवडणुका घेणे हे मतदारांवर अन्याय केल्यासारखे होईल असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे.
तर राज्यपाल राजवटीसाठी पीडीपीने ओमर अब्दुल्ला यांना जबाबदार ठरवले आहे.
राज्यात गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. त्या पाठोपाठ भाजपला २६, नॅशनल कॉन्फरन्सला १५, काँग्रेसला १२ जागा मिळाल्या होत्या.
राज्यात सरकार स्थापन करण्याची अंतिम तारिख १९ जानेवारी आहे. त्यामुळे त्याआधी पीडीपी-भाजप, पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स किंवा पीडीपी- नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस या पक्षांची आघाडी होणे आवश्यक आहे.
राज्यात १९६५पासून आतापर्यंत तीन वेळा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.