24 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News आमदार गजबेच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

आमदार गजबेच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0
26

गडचिरोली/ देसाईगंज,दि.23 : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार  कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज   सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.मृतकाचे नाव  भास्कर चौके (३५) असे नाव आहे.
आज सकाळी भास्कर चौके हा मोटारसायकलने आमदार गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आला. मोटारसायकल खाली ठेवून तो वरच्या मजल्यावरील जनसंपर्क कार्यालयात गेला. यावेळी कार्यालय कुलुपबंद होते. काही क्षणातच त्याने प्रवेशद्वारासमोरच स्वत:च्या कानशिलात गोळी झाडली. बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच समोरील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आ.गजबे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांनी लगेच आ.गजबे यांनाही माहिती दिली. आ.गजबे लगेच कार्यालयात पोहचले. त्यांनी जखमी अंगरक्षक भास्कर चौकेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर भास्कर चौके यास गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले . मात्र गंभीर जखमी झालेल्या  भास्कर  चौके यांचा मृत्यू झाला.
भास्कर चौके हा आ.कृष्णा गजबे यांच्या पोटगाव या गावचा रहिवासी आहे. तो आपल्या परिवारासह देसाईगंज येथे वास्तव्य करीत होता. दोन वर्षांपासून तो आ.गजबे यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. पारिवारिक कलहातून त्याने आत्महत्या  केल्याचे बोलल्या जात आहे.