“उद्धव ठाकरे म्हणतात सीमाप्रश्न नाटकवाल्यांचा नाही’

0
13

मुंबई – ‘नाट्यसंमेलनाद्वारे सांस्कृतिक वातावरण निर्माण करून तेथील स्थानिक कलाकारांना व प्रेक्षकांना प्रोत्साहन देणे व भाषिक संमेलन घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न हा आमचा प्रश्न नव्हे, हा सल्ला स्वत: उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिला आहे,’ असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. बेळगाव येथे ६, ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ते बाेलत होते.

जोशी म्हणाले, ठाकरे साहेबांनी ‘सीमाप्रश्न तुमचा नव्हे, आमचा आहे’ असे नाट्य परिषदेस सांगितले आहे. यावर पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले कार्यवाह दीपक करंजीकर यांनी या प्रश्नाला अधिक महत्त्व न देता संमेलनाच्या यशस्वितेवर भर द्यावा, असे आवाहन केले. भाषेवर आधारित संमेलनामध्ये असे वाद नकॉत, असेही मत त्यांनी या वेळी मांडले.

सेनेची उपस्थितीच ठरू शकते वादग्रस्त
कर्नाटकमध्ये शिवसेनेला अत्यंत विरोधी वातावरण आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे या संमेलनास उपस्थित राहिल्यास नवे वादंग उभे राहू शकते, अशी भीती पत्रकारांनी व्यक्त केली असता जोशी व करंजीकर यांनी ठाकरे उपस्थित राहणार आहेत की नाहीत याबाबतच अद्याप अनिश्चितता असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनाही उपस्थितीत राहण्यासाठी साकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनास उपस्थित राहावे यासाठी नाट्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या संमेलनास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचीदेखील उपस्थिती नाट्य परिषद अपेक्षित धरत आहेत. कर्नाटकाच्या मंत्र्यांनी मात्र नाट्यसंमेलनास राजकारणापासून दूर ठेवावे, असे सुचवल्याचे जोशी यांनी या वेळी सांगितले. एकूणच या संमेलनास सांस्कृतिक सोबतच राजकीय रंगदेखील चांगलाच चढण्याची शक्यता आहे.