आदिवासी आश्रमशाळेत मुलींशी अश्लील चाळे!

0
14

बदलापूर- आर्थिक परिस्थितीमुळे आश्रमशाळेत राहून शिक्षण घेणा-या गरीब आदिवासी मुलींसोबत अश्लील चाळे केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघड झाला आहे. बदलापूरजवळील काराव गावात असलेल्या उल्हास परिसर विकास प्रतिष्ठानच्या निवासी आदिवासी आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून अश्लील चाळे करणा-या आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
बदलापूर शहरापासून १५ किमी अंतरावर काराव हे गाव असून, तेथील अनेक आदिवासी बांधवांना आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलांना शिक्षण देणे शक्य नव्हते. अशा मुलांसाठी येथे कार्यरत असणाऱ्या उल्हास परिसर विकास प्रतिष्ठानने निवासी आश्रमशाळा सुरू केली आहे. या आश्रमशाळेत सुमारे ७० मुली इयत्ता १०वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत, मात्र या आश्रमशाळेचा अधीक्षक अजितसिंग गिरासे हा येथील ८ वी ते १०वीच्या विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त कॉम्प्युटर रूममध्ये बोलावून अश्लील चित्रपट दाखवणे, त्यांच्याशी अश्लील चाळे करणे असे प्रकार करत असल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द येथील काही पीडित मुलींनी केला आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनाही अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांनी अधीक्षकाविरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचे या विद्याíथनींचे म्हणणे आहे. मात्र सुट्टीत घरी गेल्यावर यापैकी काही जणींनी घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलींच्या पालकांनी श्रमजीवी संघटनेच्या मदतीने बदलापूर ग्रामीण पोलिसात याबाबतची तक्रार दिली.
बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पोक्सा कायदा) कलम १२ अंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधीक्षक अजितसिंग गिरासे (३५) याला अटक केली आहे. या प्रकारानंतर बदलापूर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पैशाअभावी मुलींना आश्रमशाळेत शिकायला पाठवावे की अशिक्षित म्हणून घरात बसवावे, या विवंचनेत सध्या आदिवासी पालक आहेत.