अतरौली (उत्तर प्रदेश) – अतरौली विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद चौधरी यांची शनिवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याने उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
चौधरी यांच्या वाहनचालकाने दिलेल्या माहितीप्रमाणे ते शनिवारी महावीर गंज येथे एका बैठकीस उफस्थित राहण्यासाठी जात होते. त्यांचे वाहन बाराद्वार चौकात आल्यानंतर तेथे पूर्वीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. जखमी चौधरी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चौधरी यांच्या कुटुंबियांनी या हल्ल्याबाबत मौन बाळगले आहे. तर पोलिसांनी हल्लेखोरांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.