‘मुंबई बंदरातील व्यवहार गुजरातला हलविण्याचा मोदी सरकारचा डाव ‘

0
11

मुंबई – नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई बंदर बंद करून येथील 1000 कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलविण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईच्या विकासात या गोदीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आज या गोदीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. तर लाखो लोक या गोदीवर अवलंबून आहेत. अशा वेळी मोदी सरकारकडून मुंबई गोदीतील 1,000 हजार कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलविण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडे स्वतःच्या मालकीची 1800 एकर जागा आहे. ही जागा मोदी सरकारकडून गडकरींच्या माध्यमातून काही खाजगी उद्योगपतींना विकण्याचा डाव आहे. सध्या या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 10,000 झोपड्यामध्ये तसेच 4000 जुन्या चाळींमध्ये लोक राहत आहेत, इथे अनेक कामगार, दुकानदार, छोटे व्यावसायिक आहेत. जर ही जागा विकली तर हे लोक रस्त्यावर येणार आहेत आणि त्यातच ही जागा खाजगी उद्योजकांना बीओटी तत्त्वावर विकण्याचा सरकारने घाट घातला आहे.

सध्या या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून रवि परमार काम पाहत आहेत. त्यांच्याकडेच गुजरातच्या कांडला बंदराचा कार्यभार आहे. या परमार यांच्या माध्यमातून मुंबई बंदरातील 1000 कोटी रुपयांचा व्यवहार कांडला बंदरात हलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा विकण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या जागेवरील लोकांच्या पाठीशी असून, येथील रहिवासी, कामगार, दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्या बाजूने आंदोलन करेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.