नागपूर-जबलपूर प्रवास तीन तासाने कमी

0
15

नागपूर ,दि.28ः-नागपूर-जबलपूर प्रवास आता ३ तासाने कमी होणार आहे. कारण नागपूर – जबलपूर मार्गावर नैनपूर-घंसौरदरम्यान ब्राडगेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ नैनपूर-बालाघाटदरम्यान ब्रॉडगेजचे उर्वरित असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.सध्या स्थितीत घंसौर-नैनपूरपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने येथून पॅसेंजर गाड्या चालविल्या जातील. आज मंगळवार २८ नोव्हेंबरला रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाई यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात येईल. जबलपूर ते नैनपूर या मार्गावर प्रवासी सुविधा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना सोईचे होणार आहे.
सद्यस्थितीत नागपूरहून जबलपूरला जाण्यासाठी दिल्ली मार्गाने जावे लागते. इटारसीहून घंसौर व जबलपूरचा प्रवास निश्‍चित करावा लागतो. दरम्यान, काही सेक्शनमध्ये विद्युतीकरण नसल्यामुळे इंजिन बदलावे लागते. डिजल इंजिन जोडल्यानंतर पुढील प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागपूरहून जबलपूरचा प्रवास करण्यासाठी ९ ते १0 तासांचा अवधी लागतो. हा प्रवास प्रवाशांसाठी कंटाळवाना तर असतोच, शिवाय वेळही खर्च होतो. प्रवाशांचा विचार करीत रेल्वे बोर्डाने रेल्वे अर्थसंकल्पात गोंदिया ते जबलपूर या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज करण्याच्या कामाची घोषणा केली होती. यानंतर या मार्गाच्या कामाचा शुभारंभ झाला. सद्यस्थितीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत घंसौर ते नैनपूर पर्यंत ३५ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ नैनपूर ते बालाघाट पर्यंतचे काम उर्वरित आहे. हे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तविली जाते. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर – गोंदिया, बालाघाट, नैनपूर-घंसौर, जबलपूरचा प्रवासांचे तास कमी होतील.