जिल्हाधिकारी कार्यालय,मंत्रालय व राजभवनात संविधान दिन साजरा

0
33

गोंदिया,दि.२७ : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २७ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची उपस्थिती होती.
श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, भारतीय संविधान हे जगात आदर्श संविधान आहे. स्वातंत्र्यानंतर अत्यंत परिश्रमाने आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने संविधान तयार करण्यात आले. भारत हा विविध धर्म, भाषा, प्रांत याने नटलेला देश असून सर्वांचा या संविधानात विचार करण्यात आला आहे. भारतीय संविधानाने समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणा विरुध्दचा, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक आणि संविधानिक उपाययोजनेचे नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहे. सोबतच नागरिकांना त्यांची मुलभूत कर्तव्य सांगितले असल्याचे ते म्हणाले.यावेळी श्री.ठाकरे यांनी भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाला अधीक्षक राजेंद्र अरमरकर, लेखाधिकारी लेखीचंद बाविस्कर, नायब तहसिलदार आर.एस.पटले, श्री.मडावी, श्री.जांगळे, श्रीमती मलेवार, नाझर राजेश मेनन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली, दि. 27 : भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी सभागृहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो खुदाबक्श तडवी, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मंत्रालय व राजभवनात संविधान दिन साजरा
मुंबई, दि. 27 : उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय उपस्थित होते. काल मंत्रालयाला शासकीय सुट्टी असल्याने आज हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे सचिव बी वेणूगोपाल रेड्डी  यांनी राजभवनातील अधिकारी,
कर्मचारी तसेच पोलीसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 26 नोंव्हेंबर रोजी रविवार असल्याने आज उद्देशिकेचे वाचन
करण्यात आले.