भाजप-सेना सरकारात मतभेद नाहीत-फडणवीस

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – शिवसेना-भाजपचे सरकार एकदिलाने काम करत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर “सह्याद्री‘ अतिथिगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित होते.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे नाराज असल्याच्या वावड्या उठत होत्या. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या असोत किंवा अन्य महत्त्वाच्या निर्णयांत मुख्यमंत्र्यांकडून खडसे यांना डावलेले जात असल्याची वारंवार चर्चा सुरू होती. “सह्याद्री‘वर गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात फडणवीस आणि खडसे आजूबाजूला बसले असताना एकमेकांकडे बघत नसल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या मुद्द्यावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि प्रसारमाध्यमांतच या सर्व चर्चा सुरू असल्याचा टोला लगावला. वास्तविक पाहाता, “त्या‘ दिवशी आम्ही एकत्रितपणे अर्धा तास चर्चा केली असून, चहापानही केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आज खडसे माझ्याच बाजूला बसल्याचे ते म्हणाले. या वेळी “मी मुख्यमंत्र्यांकडे आता बघतो,‘ असे म्हणून खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मान वळवली, तेव्हा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी “बघतो की बघून घेतो,‘ अशी कोटी केल्याने उपस्थित मंत्र्यांमध्ये खसखस पिकली.