पुणे – “तत्त्वांशी तडजोड करायची असती तर शरद पवार १९९९ मध्येच देशाचे उपपंतप्रधान झाले असते; अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी ऑफर दिली होती,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.
“राष्ट्रवादी’च्या प्रतिनिधी संमेलनाचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाले. राष्ट्रवादी’चे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे, विजयसिंह मोहिते, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
“वाजपेयी यांनी १९९९ मध्ये स्वतःहून पवारांशी संपर्क साधून केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती केली. महाराष्ट्रातसुद्धा भाजप-शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली,’ असा दावा पटेल यांनी केला. मात्र, पवारांनी वाजपेयींचे आभार मानून त्यांचा प्रस्ताव बाजूला ठेवला. सत्ता हेच ध्येय असते तर ते तेव्हाच साधता आले असते. तरीदेखील पवारांचा भरवसा नाही; ते कुणाशीही हातमिळवणी करू शकतात, अशी टीका होते, असे पटेल म्हणाले. मोदींच्या पंतप्रधानपदाकडे धर्मांधता व लोकशाहीविरोधी तत्त्वांचे प्रतीक म्हणून पाहावे लागेल, असे त्रिपाठी म्हणाले.
पवारांचा सल्ला लागतो : “मोदी यांना अमेरिका, रशिया, चीन सोडून भारतीय शेतकर्यांकडे पाहायला वेळ नाही. अर्थमंत्र्यांना तर काहीच कळत नाही. केंद्रातील अनेक मंत्री, भाजपचे मुख्यमंत्री आजही पवारांचा सल्ला घ्यायला येतात. मदत करा असे म्हणतात,’ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.