धानाला ५00 रूपये बोनस द्या-प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे

0
10

साकोली : महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला तरी तळागाळातील कार्यकर्ता विचलित झालेला नाही. ही काँग्रेससाठी अभिमानाची बाब आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार सभेत खोटी आश्‍वासने देऊन सत्ता काबीज केली. मात्र जी आश्‍वासने दिलीत, त्यांची अद्यापही पुर्तता केली नाही. टोल नाके व एलबीटी बंद करण्याचे दिलेले आश्‍वासनही पाडले नाही.
मागच्यावर्षी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकर्‍यांना दोनशे रूपये बोनस दिला होता. यावर्षी भाजप शासनाने एकही बोनस दिला नाही. त्यामुळे येत्या ९ तारखेला राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन काँग्रेसपक्षातर्फे आयोजित करण्यात आले आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना ५00 रूपये धानाला बोनस मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे मत महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी साकोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले.
यावेळी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी आ. सेवक वाघाये, बँकेचे संचालक विकास वाघाये, प्राचार्य होमराज कापगते, उमराव आबेडे, तालुका अध्यक्ष मार्कंड भेंडारकर, शहर अध्यक्ष अश्‍विन नशीने, रेखा समरीत, जि.प. सदस्य सुनिता कापगते, सरपंच हेमलता परसगडे, माजी सभापती केवळराम लांजेवार, जास्वंद कापगते, प्रदीप मासूरकर, विजू दुबे उपस्थित होते.
यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात आलेले प्राचार्य होमराज कापगते यांच्या नेतृत्वात जांभळी, बोदरा, विर्सी, मोहघाटा, सावरबंध, सराटी, सातलवाडा, कुंभली या गावातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या हस्ते काँग्रेसपक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आ. सेवक वाघाये यांनी पुढे होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्ष संघटनेशी जुडून लोकांची कामे करा व घवघवीत यश संपादन करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
प्राचार्य कापगते यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करू नका अशी सुचना प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांना सभेत जाहीरपणे केली. संचालन तालुका अध्यक्ष मार्कंड भेंडारकर यांनी केले. आभार गुलाब कोटांगले यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)