..तरीही भाजपला विरोधीपक्ष नेतेपद देऊ- कुमार विश्वास

0
8

नवी दिल्ली–भाजपला दिल्ली विधानसभेत सातपेक्षाही कमी जागा मिळाल्या तरी आम्ही त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ, असे मत व्यक्त करीत ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाची विरोधकांबद्दलची सकारात्मक भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केले.
कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरील माहिती दिली आहे. ते म्हणतात की, “भारतात स्विकारार्हतेनेच लोकशाही चालते. भाजपला सातपेक्षा कमी जागांवर जरी विजय मिळाला तरीही त्यांना आम्ही विरोधीपक्षनेते देऊ.”दरम्यान, लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर भाजपने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावरही दावा करू दिला नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदच न दिल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने वेगळा पायंडा घातला आहे. लोकसभेत बहुमताने निवडून आलेल्या भाजपला दिल्ली विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदावर देखील दावा करता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा ‘आप’च्या कुमार विश्वास यांनी भाजपला विरोधीपक्ष नेतेपद देण्याचे विधान करून सकारात्मक राजकारणाच्या दृष्टीकोनातून भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.