केजरीवालांच्या शपथसमारंभावेळी मोदी असणार पवारांसोबत बारामतीत

0
7

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी बारामती व मुंबईच्या दौ-यावर येत आहेत. दरम्यान, त्याच दिवशी दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांनी मोदी यांची आज सकाळी भेट घेऊन शपथ समारंभासाठी आमंत्रण दिले. मोदींनी ते निमत्रंण स्वीकारले मात्र मोदी थपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याचे समजते आहे. पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा नियोजित असून, महिन्याभरापूर्वीच तो फिक्स करण्यात
आल्याचे पीएमओने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदी केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित न राहता त्यावेळी बारामतीत शरद पवारांसमवेत असतील हे स्पष्ट झाले आहे.
पीएमओच्या वेळापत्रकानुसार, येत्या शनिवारी मोदी सकाळी 7 वाजता दिल्लीतून पुण्याकडे रवाना होतील. साडेनऊच्या सुमारास पुणे विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते चाकणकडे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या उद्घाटनाला जातील व त्यानंतर 11च्या सुमारास बारामतीत दाखल होतील. दुपारी 12 ते 3 या वेळेत मोदी बारामतीतील विविध प्रकल्पाचे उद्घाटन, पाहणी करतील. त्यानंतर शारदानगर येथील कृषि विज्ञान केंद्र परिसरात शेतक-यांचा एक मेळावा आयोजित केला आहे. त्याला पंतप्रधान मोदी संबोधित करतील व त्यानंतर चारच्या सुमारास मोदी पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भोजनासाठी जातील.
सायंकाळी 5 नंतर मुंबईकडे रवाना होतील. तर रात्री 10 नंतर मोदी मुंबईतून थेट दिल्लीकडे रवाना होतील.