क्लीन चिट देणारे समिती सदस्यही परिचारकांच्या निलंबनासाठी अाग्रही

0
8

मुंबई,दि.06-वर्षभरापूर्वी साेलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचार सभेत लष्करी जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजप पुरस्कृत अपक्ष अामदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर विराेधी पक्षांच्या अामदारांनी मंगळवारी भाजप सरकारला जाब विचारला. इतकेच नव्हे विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांचे कामकाजही बंद पाडले. विशेष म्हणजे विराेधकांचे बहुमत असलेल्या विधान परिषदेत २८ फेब्रुवारी राेजी निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला हाेता. तेव्हा काेणीही त्याला फारसा विराेध केला नाही. मात्र साेशल मीडियातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्याने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अापल्या अामदारांचे कान पिळल्याने दुसऱ्याच दिवशी निलंबन कायम ठेवण्याची मागणी जाेर धरू लागली. परिचारकांना अाधी क्लीन चिट देणाऱ्या समितीतील सदस्यही अाता त्यांचे निलंबन कायम ठेवण्यासाठी अाक्रमक झालेले दिसून अाले.

परिचारक यांच्या बेताल वक्तव्याची चाैकशी करणाऱ्या समितीत सभापती रामराजे निंबाळकर (अध्यक्ष), मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे तत्कालीन अामदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, काँग्रेसचे शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, शिवसेनेच्या नीलम गाेऱ्हे यांचा समावेश हाेता. या समितीसमाेर परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली हाेती. सैनिकांचा अपमान करण्याचा अापला हेतू नव्हता, हा त्यांचा युक्तिवादही समितीने मान्य केला हाेता. त्याच अाधारे त्यांचे निलंबन २८ फेब्रुवारी राेजी मागे घेण्यात अाले. मात्र दुसऱ्याच दिवशी शिवसेना कठाेर कारवाईसाठी अाक्रमक झाली. तर साेमवारी तटकरे, कपिल पाटील, नीलम गाेऱ्हे या समिती सदस्यांसह त्यांच्या पक्षातील इतर अामदारांनीही बडतर्फीची अाक्रमक मागणी लावून धरली.