नितीशकुमार 22 तारखेला घेणार शपथ

0
7

पाटणा – बिहारच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. आज (शुक्रवार) मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीच राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. आता जनता दलाचे (यू) नेते नितीशकुमार येत्या 22 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. मांझी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन मांझी आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्लाबोल केला आहे.
नितीशकुमार म्हणाले, ‘भाजपचा घोडा तर शर्यत सुरु होण्याआधीच बसला. बिहारच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. राज्यपाल विधानसभेच्या संयुक्त आधिवेशनाला संबोधित करणार होते. सर्व तयारी झाली होती. मांझी यांनीच अधिवेशन बोलावले होते आणि त्याच्या अर्धातास आधीच मैदान सोडून पळाले. ‘ भाजपवर हल्ला करताना नितीशकुमार म्हणाले, ‘जे लोक विधानसभा अध्यक्षांवर आरोप करत होते, आता त्यांच्या आरोपात तथ्य उरलेले नाही. भाजपने तोड-फोडीचे राजकारण सुरु केले होते. त्यांना जेडीयूला तोडायचे होते, मात्र आमची एकता एखाद्या पाहाडासारखी आहे. यामुळे भाजपचा गेमप्लॅन उघड झाला आहे.’ नितीशकुमार आता राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहात आहेत. ते कोणत्याही क्षणी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
बिहारच्या जनतेची माफी मागतो
नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेची माफी मागितली. ते म्हणाले, ‘मी बिहारच्या जनतेची सार्वजनिकरित्या माफी मागतो. मला विश्वास आहे, की जनता मला माफ करेल. भावनेच्या भरात मी राजीनामा दिला. ती माझी चूक होती. यापुढे भावनाविवश होऊन राजीनामा देणार नाही असा विश्वास देतो. गेली साडेआठ वर्षे ज्या पद्धतीने विकासाचे काम केले यापुढेही त्याचपद्धतीने काम करत सरकार चालवणार आहे.’ मांझीबद्दल ते म्हणाले, त्यांच्याकडे बहुमत नव्हते तर आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता.