कॉ. गोविंद पानसरे यांचे मुंबईत निधन

0
14

मुंबई- अज्ञात हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात जखमी झाल्यानंतर गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे ऊर्फ अण्णा (वय 82) यांचे रात्री 11च्या सुमारास येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी गोळीबार झाला होता.त्यांच्यावर कोल्हापुरातील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोल्हापूरहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांना फुफ्फुसात रक्तस्राव झाला. त्यानंतर रक्ताची उलटी झाली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार या गावात पानसरे यांचा जन्म झाला. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले पानसरे नंतर कम्युनिस्ट चळवळीकडे वळले. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे सध्याचे वास्तव्य कोल्हापुरात असले तरी संबंध महाराष्ट्रात पुरोगामी राजकीय चळवळीत ते आघाडीवर होते. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते असेच आघाडीवर राहिले होते.
दरम्यान, पाच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
लाल सलाम…!
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून हिरावून नेला, याचे मला अतिशय दु:ख वाटते.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. – खासदार सुप्रिया सुळे
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने डाव्या चळवळीबरोबरच शोषित, दलित समाजाचे नुकसान झाले आहे – रिपाइं नेते रामदास आठवलेझुंजार पुरोगामी नेता गमावला
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे शोषितांसाठी अखेरपर्यंत लढणारा झुंजार पुरोगामी नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरून निघणार नाही. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
– रावसाहेब पाटील दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष

गोविंद पानसरे यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी नामुष्कीची बाब आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी अस्वस्थ झालो आहे. पुरोगामी महाराष्ट्र व कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या नेत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने माझ्यासह त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांसमोर भविष्याची चिंता लागून राहिली आहे. शासनाने ऍड. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे.
– प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते

ऍड. पानसरे यांच्या निधनाने कोल्हापूरसह राज्यातील पुरोगामी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारा माणूस निघून गेला. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
– धनंजय महाडिक, खासदार

ऍड. पानसरे यांचे निधन हे दुर्दैवी, दुःखदायक आहे. पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावण्याचे काम या घटनेने केले आहे. शासनाने या घटनेमागील सूत्रधारांचा आणि मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी. ऍड. पानसरे यांच्या कुटुंबीयांना झालेल्या दुःखात मी सहभागी आहे.
– राजू शेट्टी, खासदार

पुरोगामी विचारांना धक्का देणारी ही घटना आहे. पानसरे यांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी झाली आहे. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार नव्या पिढीला नेहमी प्रेरणा देत राहतील. नवी पिढी त्यांचे विचार आत्मसात करत, नवा अध्याय लिहिल्याशिवाय राहणार नाही.
– डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू (शिवाजी विद्यापीठ)

कोल्हापूरला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका पुरोगामी नेत्याची हत्या होणे यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. विचारांची लढाई विचाराने व्हायला हवी. तसे न होता थेट पुरोगामी नेत्यावर हल्ला करणे, हा कसला विचार? त्यांची झालेली हत्या कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांची हत्या आहे.
– डॉ. वसंतराव मोरे (हिंदी शिवचरित्रकार)

राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन अण्णांनी गेली चाळीस वर्षे सर्वसामान्यांच्या हिताकरिता आयुष्य वेचले. परखडपणे भावना व्यक्‍त करत त्यांनी लढा उभा केला. ते स्पष्टवक्ते होते. त्यांचे विचार नव्या पिढीला भावणारे होते.
– वसंतराव मुळीक (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ)