भारत आर्थिक महासत्ता होणार – मुख्यमंत्री

0
25

नागपूर : भारताला आर्थिक महासत्ता होण्याची फार मोठी संधी आहे. तरुणांची मोठी फौज आपल्या देशात उपलब्ध आहे. आपण जगात प्रस्थापित होऊ शकतो. यासाठी तरुणांनी गुणवत्तेच्या आधारे पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 101 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे तर विशेष अतिथी म्हणून पद्मविभूषण डॉ. विजय केळकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, समाजामध्ये खूप मोठा घटक अजूनही उच्च शिक्षणापासून वंचित आहे. या घटकाला सामावून घेण्यासाठी विद्यापीठांनी ज्ञानाचा विस्तार करताना वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवे कौशल्य अभ्यासक्रम निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गुणवत्तेसोबत कोणतीच तडजोड करण्याची गरज नाही. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.

डॉ. केळकर म्हणाले, भारतातील तरुण पिढीसाठी सध्या सुवर्णकाळ सुरु आहे. येत्या दहा वर्षांमध्ये जागतिकीकरणात भारत मोठी झेप घेणार असून आर्थिकदृष्ट्या महासत्ता होण्याकडे आपल्या देशाची वाटचाल सुरु आहे. अशावेळी तरुणांनी या संधीचे सोने करावे, व देशाचा आर्थिक दर वाढविण्यासाठी हातभार लावावा.

कुलगुरु म्हणाले, ज्ञानाच्या संधी आणि विकास साधण्यासाठी संशोधन आणि उद्योजगता यांची सांगड घालणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण देशच जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे उद्योगापासून शिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.