आरएसएसच्या मुखपत्रात काश्मीरचा भूभाग दाखवला पाकमध्ये

0
19

नवी दि्ली, दि. १२ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’च्या ताज्या अंकांत भारताचा नकाशा चुकीचा दाखवत काश्मीरचा मोठा भाग पाकिस्तानच्या भूभागावर दाखवण्यात आल्याने खळबळ माजली आहे. एरवी अशा चुकांवर कडाडून हल्ला करणा-या संघाला या चुकीमुळे मान खाली घालावी लागली असून चहुबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे.
येत्या १५तारखेला प्रसिद्ध होणा-या या अंकात ‘सार्क’विषयी लेख छापण्यात आला असून त्यात भारताचा नकाशाही दाखवण्यात आला आहे. मात्र त्यात जम्मू-काश्मीरचा मोठा भाग पाकिस्तानात दाखविण्यात आला आहे. ऑर्गनायझरचे नियमित वाचक जॉन दयाल यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी नकाशाचा नकाशाचा फोटो काढून फेसबुकवर टाकून ही चूक निदर्शनास आणून दिली.
दरम्यान या चुकीचे गांभीर्य लक्षात आल्यावर ‘ऑर्गनायझर’चे संपादक केतकर या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून ‘ हा नकाशा सार्कच्या वेबसाइटवरून घेण्यात आल्याचे स्पष्ट करत अनावधानाने ही चूक घडल्याचे मान्य केले. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगत यापुढे अशी चूक घडणार नाही अशी ग्वाहीही दिली. ‘ऑर्गनायझर‘च्या संकेतस्थळवरील अंकातून संबंधित नकाशा हटविण्यात आल्याचेही स्पष्ट केले.