विरोधकांना घाबरवण्यासाठी हेरगिरी का ?

0
14

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेमध्ये केंद्र सरकारला जाब विचारला.
सरकारचे हे पाऊल लोकशाही मूल्य आणि स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. हे या आधी देशात कधीही झाले नव्हते. बूटाचे माप, सवयी, कोण मित्र, सहाकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांक याचा काय संबंध ? हे सर्व आकलनापलीकडचे आहे असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
सभागृहाच्या आत आणि बाहेर नेत्यांकडून जे मुद्दे उपस्थित केले जातात त्यासाठी त्यांना घाबरवण्याची सरकारची ही पध्दत आहे का? राजकीय पक्षांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारची हेरगिरी केली जात आहे का? असे प्रश्न गुलाम नबी आझाद यांनी सरकारला विचारले.
सरकारकडून या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, काँग्रेस तीळा एवढीही जी गोष्ट नाही त्याचा डोंगर करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व्हीआयपी अतिमहत्वाच्या व्यक्तीची माहिती ठेवली जाते. ही हेरगिरी नसून, याआधीही अतिमहत्वाच्या व्यक्तीबद्दल जाऊन चौकशी केली आहे असे जेटलींनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी घरात नसताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली होती. मोदींच्या विरोधकांवर पाळत ठेवण्याच्या गुजरात मॉडेलवर काँग्रेसने जोरदार टीका करताना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली होती.