भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सोनिया गांधींच्या नेतृत्वात मोर्चा

0
10

नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाच्या विरोध करणारे विरोधक आज (मंगळवारी) रस्त्यावर उतरले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाच्या जवळपास 200 खासदारांनी संसद ते राष्ट्रपती भवनदरम्यान मोर्चा काढला. संसद भवन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे वंदन करून मोदी सरकार विरोधात मोर्चास प्रारंभ झाला.सोनिया गांधी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, जनता दल युनायडेडचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव, तृणमूल कॉंग्रेसचे सौगत राय आणि डेरेक ओ ब्रायन, अन्नाद्रमुकच्या एम. के.कनिमोझी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे के डी. राजा मोर्चात पुढे चालत होते.भूसंपादन विधेयका विरोधात एक निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे देण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त 26 खासदारांना परवानगी मिळाली होती. मोर्चात तृणमूल कॉंगेस आणि डाव्या पक्षाचे नेते एकत्र दिसले. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार ‘हम होंगे कामयाब’ हे गीत गात होते.
दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षाच्या या मोर्चाला सुरुवातीला विरोध केला होते. नंतर मात्र पोलिसांनी मोर्चाला मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता.