मुंबई- विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे, शिवसेनेच्या उमेदवार नीलम गो-हे, अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे यांनी त्यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले.
विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज सकाळी अचानक शिवसेनेचा आवेश ओसरला. भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेना या निवडणुकीसाठी एकत्र आहे असे सांगितले. भाजप-सेनेने सभापती निवडणुकीसाठी बहिष्कार घातल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, या घडामोडीनंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे या आपला अर्ज माघार घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आपण का अडकत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सांगितल्यानंतर दोन्ही पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. भाजपने हा निर्णय शिवसेनेला पटवून दिला व तो सेनेला पटलाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत होते. भाजप-सेनेने बहिष्कार टाकल्याने काँग्रेसनेही माघार घेणे पसंत केले. त्यामुळे रामराजे बिनविरोध निवडून आले.
नाव – रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर
जन्म – 8 एप्रिल 1948
शिक्षण – बी. एस्. सी, एल. एल. एम (आंतरराष्ट्रीय कायदा)
व्यवसाय – शेती आणि कायद्याचे अध्ययन
छंद, आवड – क्रिकेट, वाचन