साकोली,दि.13ः-विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता साकोली सेंदूरवाफा येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेश प्रभारी खा. सरोज पांडे व भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजप उमेदवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला सुमारे ६0 हजार नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच साकोली व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खा. सुनील मेंढे यांनी केले आहे.





