नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.24 : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत रिट याचिका दाखल केली असून या याचिकेवर रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आलीे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आज रविवारला सकाळी 11.30 वाजता ठेवली असून याकडे लक्ष लागले आहे.याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत नमूद करणात आले आहे. याचिकेत राज्यपालांच्या निर्णयाच्या वैधतेल आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही तिन्ही पक्षांनी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे.
पहिला याचिकादार पक्ष शिवसेना हा महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेकडे ५६ आमदारांचे बळ आहे. दुसरा याचिकादार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदारांचे बळ आहे तर तिसरा याचिकादार पक्ष काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. या तिन्ही पक्षांकडे मिळून बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आहे. असे असताना राज्यपालांनी मनमानी पद्धतीने पावलं उचलल्यानेच आम्हाला घटनेच्या कलम ३२ नुसार रिट याचिका दाखल करावी लागत आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे बहुमत असून आमच्या आघाडीला सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्याचे निर्देश राज्यपालांना द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे वकील सुनील फर्नांडिस यांनी माहिती दिली.





