*सालेकसा नगर पंचायतीचा प्रकार*
सालेकसा,दि.24ःभारत सरकार ने घरकुल आणि आवास योजनेच्या अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळणार असे घोषणा करून त्या अनुषंगाने काम सुरू केले. परंतु सालेकसा नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या गावात मात्र या योजनेला राजकारणाचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. सालेकसा नगर पंचायत मधील घरकुल करिता अर्ज केलेल्या नागरिकांना कित्तेक वर्षे लोटून अद्याप लाभ मिळाला नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे नेते मंडळींच्या खास आणि सत्ताधार्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र घरकुलाचा लाभ प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जात आहे. घरकुल किंवा आवास योजनेची लाभार्थी निवड प्रक्रिया ही खाजगीकरण केल्याने काही खाजगी कर्मचारी लाभार्थ्यांची निवड करतात, त्यात मोक्क्यावर जाऊन लाभार्थ्यांच्या निकषावर कार्यप्रारंभ करण्याची ना हरकत दिली जाते अन्यथा त्यांना त्या यादीतून बाद केले जाते. सालेकसा नगर पंचायत अंतर्गत होत असलेल्या मोक्का चौकशीसाठी येणारे कर्मचारी राजकीय दबावात चौकशी करत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे सालेकसा नगर पंचायत येथील मुख्याधिकारी महिन्याभरापासून वैद्यकीय रजेवर असल्याने सध्या प्रभार नायब तहसीलदार भुरे यांच्याकडे आहे तर नगर पंचायत अभियंता सुद्धा उपस्थित नसल्याने त्याचा प्रभार गोंदिया नगर परिषदेच्या कनिष्ठ अभियंता दाते यांच्याकडे आहे. नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी रजेवर असल्याने नागरिकांच्या समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आमगाव खुर्द सारख्या नव्याने शामिल झालेल्या गावाला लोकप्रतिनिधी सुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांच्या समस्येत आणखीन वाढ झाली आहे.
एकीकडे अटीमध्ये न बसता अटीला शिथिल करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतोय तर दुसरीकडे सर्व अटी मध्ये बसून सुद्धा खऱ्या लाभार्थ्यांना डावलले जात आहे. ग्रामपंचायत आमगाव खुर्द असताना घरकुलासाठी अर्ज केलेले आज नगरपंचायत मध्ये सामील होऊन वर्षे लोटली तरीसुद्धा त्यांना लाभ मिळालेला नसल्याने नागरिकांचा मनस्ताप होत आहे. तर दुसरीकडे नगरपंचायत सामील झाल्यानंतर अर्ज करणाऱ्यांना मात्र घरकुलाचा लाभ देण्यात आला. ज्यांना सध्या राहायला घर सुद्धा नाही अशा नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आमगाव खुर्द ग्राम पंचायत असताना ज्यांनी अर्ज केले होते ते अर्ज बाद झाल्याने त्यांना पुनः अर्ज करायच होत. आणि त्या तारखीपासून त्यांचे अर्ज गृहीत धरण्यात आलेले आहेत. तरी मी वयक्तिक याकडे लक्ष देवून गरजूंना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.
– विरेन्द्र ऊइके
नगराध्यक्ष नगर पंचायत सालेकसा





