मुंबई,दि.26 – आमच्याकडे बहुमत उरलेले नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सत्ता स्थापनेपासून माघार घेतली आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला.यावेळी चंद्रकांत पाटील,रावसाहेब दानवे,राधाकृष्ण विखे पाटील,बबनराव पाचपुते,गिरीश महाजन,सुभाष देशमुख व किरीट सोमय्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
भाजप आणि शिवसेनेने विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली. यामध्ये भाजपला जनमताचा कौल मिळाला. भाजपने 67 टक्के जागा जिंकत 105 आमदार निवडून आणले. तर सेनेच्या हाती लढवलेल्या जागांपैकी 40 टक्के जागा लागल्या. दुर्दैवाने ही युती सत्ता स्थापित करू शकली नाही. त्याचे कारण शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर अडून आम्हाला समर्थन देण्यास नकार दिला. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार हे कधीच ठरले नव्हते असा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.





