नक्षल्यांच्या बीमोडासाठी नागा बटालियन द्या-रमण सिंह

0
7

रायपूर दि. १2 –: छत्तीसगडमधून नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी नागालँड सशस्त्र पोलीस तथा त्यांच्या तज्ज्ञांचा फौजफाटा देण्याची आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे नुकतीच केली आहे. आमच्या मागणीवर गृहमंत्रालय हे नागालँड सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सोमवारी सांगितले.

राजधानी रायपूर येथे पत्रकारांशी बोलताना रमण सिंह म्हणाले की, छत्तीसगडच्या बस्तर या हिंसाग्रस्त संवेदनशील भागात नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी नागा बटालियन राज्य सरकारला हवी आहे. ही बटालियन उत्तम दर्जाचे कार्य करू शकते. नक्षल्यांविरुद्ध लढण्यासाठी नागा बटालियन आतापर्यंत नेहमीच उपयुक्त ठरली आहे. जंगलातील युद्ध लढण्यासाठी नागा बटालियन अतिशय कर्तव्यतत्पर आहे. राज्यातील नक्षलवाद संपुष्टात येईल, यात काहीही शंका नाही. सरकारने मोठय़ा प्रमाणावर विकास कामे केली आहेत. त्यामुळे नक्षलवादी सध्या निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही नक्षलवाद्यांची पाळेमुळे उखडून फेकण्यात यशस्वी होऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बस्तर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या संदर्भात केरळहून मोठा असून, तो नक्षलग्रस्त आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्याला लागून आहे. छत्तीसगडमध्ये हजारो कुख्यात वीरप्पन दडलेले आहेत. आम्ही त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी सक्षम असल्याचा विश्‍वास रमण सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच नक्षलवाद हा विकास कामात मोठा अडथळा असल्याचे म्हटले होते.