अमरावती,दि.08ः- कार आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात वृद्ध आई वडीलांसह मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास माहुली जहागीर येथे महामार्गावर घडली.घटनेत नातू देखील गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. सर्व जण एकाच कुटुंबातील असून वडिलांच्या उपचारासाठी सदर कुटुंब हे कारने अमरावती जात असतांना माहुली जहागीर गावाच्या समोर एका पुलानजीक उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर ही कार धडकल्याने दुर्दैवी अपघात झाला.सोमेश प्रभाकर काळबेंडे (२६),प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (६५),राजमती प्रभाकर काळबेंडे (६२) रा. सर्व वरुड यांचा मृतांमध्ये सहभाग असून वरद सुरेंद्र दोंदळकर (१०) रा वरुड हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.वडिलांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायचे असल्याने सोमेश काळबेंडे सकाळी ११ वाजता वरुड येथून स्विफ्ट कार क्र. एम.एच. २७,बी झेड ०७०६ ने निघाले.दुपारी एक वाजताच्या सुमारास माहुली जहागीर पुढे एका पुलाजवळ ही भरधाव कार अमरावती कडे जात असताना समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला कारने जबर धडक दिली.धडक एवढी भीषण होती की कारचा पुढचा भाग चकनाचूर झाला होता. यामध्ये प्रभाकर रामचंद्र काळबेंडे, राजमती प्रभाकर काळबेंडे आणि सोमेश प्रभाकर काळबेंडे हे तिघे जागीच ठार झाले तर वरद दोंदळकर हा गंभीररित्या जखमी झाला.
अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ते मदतकार्य सुरू केले.माहुली जहागीर पोलीस स्टेशन चे ठाणेदार ठाकरे यांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथून जखमीला त्वरित खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरुड मध्ये एकच शोककळा पसरली.नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करीत आक्रोश केला.प्रभाकर काळबेंडे,राजमती काळबेंडे हे सेवानिवृत्त शिक्षक असून समाजातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. तर मृतक सोमेश हे कृषि संबंधित व्यवसायाशी जुळलेले आहेत.





