नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.28ः-देशात कोरोना संक्रमितांची संख्या 29 हजार 607 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय मंत्रालयानुसार, देशात 29 हजार 435 संक्रमित आहेत. यातील 21 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 6868 बरे झालेत तर 934 जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी सांगितले की, देशातली 80 जिल्ह्यांत 7 दिवसांत आणि 47 जिल्ह्यांत 14 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर 39 जिल्ह्यांमध्ये मागील 21 दिवसांत एकही प्रकरण समोर आले नाही. अशाप्रकारे 17 जिल्ह्यांमध्ये मागील 28 दिवसांत एकही पॉझिटिव्ह मिळाला नाही. मागील 14 दिवसांपासून केस दुप्पट होण्याचा दर 8.7 दिवस आहे, तर 7 दिवसांपासून हा दर 10.2 दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 1543 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 29,435 झाली आहे. त्यातील 6,869 लोक बरे झाले असून 934 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे.





