जिल्हाधिकारी यांची गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट

0
17

औषध व सुविधांची पाहणी

रुग्णांशी साधला संवाद

         गोंदिया, दि.9 :  नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना आपापल्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

        या भेटी दरम्यान औषध साठा व ऑक्सिजन उपलब्धता पुरेशी असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. रुग्णालयाची स्वच्छता समाधानकारक असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. या रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था उत्तम असल्याचे या पाहणीत आढळून आले. रुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीची गरज असून स्वच्छता कर्मचारी अधिक संख्येत असणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त असून रिक्त पदे भरण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

        रुग्णालयातील डॉक्टर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पुरेशी शासकीय निवास व्यवस्था उपलब्ध नाही तसेच उपलब्ध निवासस्थानी पाण्याची समस्या असल्याचे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत शासनास अवगत करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अडचणी व समस्यांवर मात करून या रुग्णालयात योग्य रुग्ण सेवा देण्यात येत आहे. रुग्णसेवेबाबत ग्रामीण रुग्णालय अधिकारी व कर्मचारी दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

        जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सुद्धा संवाद साधला. थोड्या अडचणी असल्या तरी उपचार नियमित मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत डॉक्टर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.