गोंदिया, दि.14 : जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता व त्यांच्या अवलंबिताकरीता तसेच सेवानिवृत्त झालेले व सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व माजी सैनिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारला सकाळी 10 वाजता सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या सैनिक मेळाव्यात खालील बाबींचा समावेश राहणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता यांच्या समस्या सोडविल्या जातील. मिलिटरी हॉस्पिटल कामठी द्वारे आरोग्य तपासणी आणि दातांची तपासणी केली जाईल. रेकार्ड ऑफिस गार्ड रेजीमेंटल सेंटरद्वारे माजी सैनिकांच्या तसेच वीर पत्नी, वीर माता यांच्या कल्याणाबाबत माहिती देण्यात येणार आहे. सेना भरती कार्यालयाद्वारे भारतीय सेनेमध्ये विविध पदाकरिता भरती होण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. जिल्हा सैनिक कार्यालय नागपूर द्वारे माजी सैनिकांच्या सुविधा बद्दल माहिती देण्यात येणार आहे. आर्मी प्लेसमेंट सेल द्वारे माजी सैनिकांच्या पुनर्नियुक्ती बद्दल माहिती देण्यात येणार आहे. संचालक ECHS बद्दल UM & G Sub Area द्वारे अडीअडचणी/ सहायता केंद्र स्थापित करण्यात येईल. माजी सैनिक विधवा तसेच वीर पत्नी, वीर माता यांच्यासाठी सी.एस.डी. कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
तरी गोंदिया जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता तसेच त्यांचे अवलंबितांनी 15 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या माजी सैनिक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.