गडचिरोली : जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी याविरोधात रस्तारोको आंदोलन करून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. चामोर्शी ते हरणघाट मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली. काँग्रेसने मात्र भाजप आमदारांच्या या आंदोलनाला नौटंकी असल्याचे सांगून आमदारकीची जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा, अशी टीका केली.
“गेल्या सहा महिन्यांपासून चामोर्शी ते हरणघाट मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून अवजड वाहने जात असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. राज्य सरकारने या मार्गासाठी २० कोटी मंजूर केले आहेत. येत्या दोन महिन्यात काम सुरू होईल, परंतु त्याआधी या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. अन्यथा गावागावात आंदोलन करण्यात येईल. लोकांच्या मागणीसाठी मी सरकारमधील आमदार असताना सुध्दा आंदोलन केले”, असे आमदार डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे.
गडचिरोली विधानसभेचे भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी हे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात. याआधी त्यांनी आदिवासी समजाचा रोष ओढवून घेतला होता. विधानसभेत गडचिरोलीचा विकास झाला असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. आता पुन्हा आमदारांनी स्वतःच्याच विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या चामोर्शी-हरणघाट मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आज रास्तारोको आंदोलन केले. राज्यात भाजप सत्तेत आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तरी त्यांच्या पक्षातील आमदाराला खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने जिल्ह्यात विकासाची किती बिकट अवस्था आहे, हे पुन्हा अधोरेखित झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.