भंडारा दि.21 : कोविड-19 रूग्णांच्या मदतीसाठी सामान्य रूग्णालय भंडारा येथे स्थापन करण्यात आलेल्या कोविड हेल्प डेस्कला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे व हेल्प डेस्कचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
हेल्प डेस्कची कार्यप्रणाली व पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. संदर्भिय रूग्णांना भरती करण्यापासून अन्य वैद्यकीय सेवांबाबत हेल्प डेस्कच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येते. त्याच प्रमाणे रूग्णाला मास्क व सॅनिटाईझर सद्धा देण्यात येते. जिल्हयाच्या अन्य भागातून सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना डेस्कच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत असल्याचे पंकज सारडा यांनी सांगितले. रूग्णालयाच्या ॲम्बुलन्सला जीपीएस सिस्टम लावण्यात येणार असून त्याव्दारे लोकेशन ट्रेसिंगसाठी मदत होणार आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
हेल्प डेस्क या ठिकाणी असलेल्या मॉनिटरचा (टिव्ही स्क्रीन) उपयोग रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये संवाद साधन्यासाठी करता येतो का याबाबत चाचणी करावी. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. असे झाल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या नावेवाईकांना एकमेकांशी दृकश्राव्य संवाद साधण्याची सोय होईल असे ते म्हणाले. अशी सुविधा शक्य असून त्यादृष्टिने लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे पंकज सारडा यांनी सांगितले.