महसूल विभागाची रेती चोरट्यांवर धडक कारवाई

0
345

अर्जुनी मोर,दि.23ःतालुक्यात चोरट्या मार्गाने विनापरवाना रेती आणणार्‍या रेती चोरट्यांविरोधात तहसीलदार विनोद मेर्शाम यांच्या नेतृत्वात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. रेती माफियांवर अंकूश लावण्यासाठी २७ तलाठी व महसूल कर्मचार्‍यांचे भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने चार ट्रॅक्टर मालक व चालकांवर कारवाई केली असून त्यांच्यावर दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली.
सध्या रेती घाट बंद असल्याने रेती माफियांनी चोरट्या मार्गाने विनापरवाना तालुक्यात रेतीचा अवैध धंदा सुरू केला आहे. अवैधरित्या रेती वाहतुकीचा बंदोबस्त करण्यासाठी तहसीलदार विनोद मेर्शाम यांच्या नेतृत्वात तालुक्यात साजा बदलून २७ तलाठ्यांचे व महसूल कर्मचार्‍यांचे भरारी पथक तयार केले आहेत. या पथकाने १७ ऑक्टोंबर रोजी उमेश सत्यवान बागडे रा. तई, तालुका लाखांदूर यांचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर वाहतूक परवाना नसताना रेतीची अवैद्य वाहतूक करताना निमगाव/शिल्ली परिसरात पकडला. तसेच विलास भेंडारकर रा. तई यांचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/एजी ४४९५ व ट्राली क्रमांक एमएच ३५/८९७0 सह चालक सेवक नामदेव कांवळे रा. तई याला अवैधरित्या रेती वाहतूक करताना पकडले. दुसर्‍या कारवाईत चालक कावळे याने पळ काढल्याने त्याच्याविरोधात अर्जुनी मोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच १९ ऑक्टोंबर रोजी हेमंत बोरकर रा. लाखांदूर यांचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६/झेड ७0८५, ट्राली क्रमांक एमएच ३६/जी ६८३ अवैद्यरित्या रेती वाहतूक करताना धाबेटेकडी येथे पकडला, २१ ऑक्टोंबर रोजी होमराज काशिवार रा.खोली (नवेगावबांध) यांचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/जी ५१४७, ट्रॉली क्रमांक एमएच ३५/एफ ५१८६ सह वाहन चालक तेजू कुलसुंगे याला अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करताना भरारी पथकाने पकडले. सर्व जप्ती करण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि मालक व चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येकी १ लाख १५ हजार ४00 रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.