25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ योजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने समित्या गठीत करा- पालकमंत्री बडोले

योजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने समित्या गठीत करा- पालकमंत्री बडोले

0
31

गोंदिया,दि.२० : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय प्रमाणे अशासकीय सदस्यांचा समावेश करुन जिल्हा व तालुका पातळीवर तातडीने समित्या गठीत करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पातळीवरील विविध समित्या गठीत करण्याच्या संदर्भाने आयोजित सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उप‍स्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, समित्या गठीत झाल्यानंतर अशासकीय सदस्यांना संबंधित योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे सोईचे होईल. त्यामुळे समित्या कार्यक्षमतेने काम करतील. समित्यांच्या सदस्य सचिवांनी सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची जाणिव करुन दयावी.
यापुर्वी अस्तीत्वात असलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आरोग्य विषयक समित्या प्रभावीपणे गठीत करुन कार्यक्षम करा असेही ते म्हणाले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन तेथील अडिअडचणींचा आढावा घेण्यात यावा. जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करुन जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून दयावा. संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे त्वरित निकाली काढून दर महिन्याच्या ७ तारखेच्या आत वृद्धांच्या बँक खात्यात त्यांचे मानधन जमा करावे.
जिल्ह्यातील नाथजोगी, पेंढारी व मांगगारोडी समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, या वंचित घटकांना जात प्रमाणपत्रामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले.
सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, उपजिल्हाधिकारी उमेश काळे, विलास ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, गोंदिया उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, देवरी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, गोंदिया आगारप्रमुख गौतम शेंडे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.