सभेने मान्यता देवूनही ई निविदा थांबविली उपसरपंचासह सदस्यांचा आक्षेप

0
350

गोंदिया  दि. 23 : : तालुक्यातील ईर्री ग्रामपंचायतीने साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठादारांकडून ई निविदा मागविण्याचा प्रस्ताव पारित केला. मात्र सरपंच आणि सचिवाने परस्पर ही प्रक्रिया स्थगित केली. यात शासकीय नियमांचा भंग झाला असून प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे.

ईर्री ग्रामपंचायतीची सभा २६ जून रोजी ठेवण्यात आली. मात्र कोरम पूर्ण झाले नसल्यान ती सभा तहकूब करून ३० जून रोजी बोलावण्यात आली. या सभेत सहावा विषय वर्षभर लागणारे साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून ई निविदा मागण्याचा विषय होता. ३० जून रोजी पार पडलेल्या सभेत ई निविदेच्या विषयाला सभेने मंजूरी दिली. मजूर आणि साहित्य पुरवठ्याकरिता ई निविदा मागविण्याचा विषय पारीत करण्यात आला. या विषयावर सचिवाला आपले मत मांडावयाचे होते. सचिव ललीत सोनवाने यांनी ५ ते १५ लक्ष रुपयांपर्यंतच्या कामांकरिता मजूर व साहित्यासह ई निविदेद्वारे कामांचे साहित्य पुरवठा धारकांकडून दर मागविता येणार नाही, असे मत मांडले. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या २६ नोव्हेंबर २०१४, २७ मे २०१५ आणि २३ फेब्रुवारी २०१८ च्या परिपत्रकात एक लाख रुपयांच्या वर साहित्य असेल तर ई निविदा मागविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. असे असताना देखील सचिव आणि सरपंचाने शासनाच्या परिपत्रकाची अवहेलना करत सभेत पारीत करण्यात आलेला विषय रद्द केला. ई निविदा मागविल्यानंतर तीन पुरवठाधारकांनी साहित्याचे दर देखील दिले होते. मात्र सचिव आणि सरपंचाने मिळून कसलीही सूचना न देता ई निविदा रद्द केल्यामुळे उपसरपंच आणि सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामविकास विभागाचे दिनांक 25-03-2015 च्या शासन निर्णय नुसार 1 लाखावरील साहित्य खरेदी व 3 लक्ष रूपयांवरील कामांची ई-निवीदा न करता परस्पर नियमबाहयपणे साहित्य खरेदी व बांधकामाची नियमबाहय ठेकेदारीची कामे सततपणे करीत आहेत. सरपंच व त्यांचे पती यांचेद्वारे केलेल्या आर्थिक अनियमिततेबाबत दिनांक 06-12-2017, 15-12-2017, 16-12-2017, 23-05-2018, 18-06-2018, 18-06-2018, 04-08-2018, 04-08-2018, 27-11-2018, 22-12-2018, 05-02-2019, 30-08-2019, 24-03-2020, 11-05-2020, 11-05-2020, 12-05-2020, 18-05-2020, 20-05-2020, 20-05-2020, 20-05-2020, 24-05-2020, 24-05-2020, 26-05-2020, 26-05-2020, 03-06-2020, 08-06-2020, 10-06-2020, 20-06-2020 अन्वये तक्रारी करूनसुध्दा प्रशासनाने त्यावर निष्पक्ष चौकशी न करता पांघरून घालण्याचे काम केले आहे. यामध्ये पंचायत समिती गोंदियाचे गट विकास अधिकारी, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तसेच नागपुर विभागाचे अप्पर आयुक्त यांचेकडे वारंवार अर्जदारांनी लेखी निवेदन सादर करूनसुध्दा संबधितांकडून सरपंच यांच्या आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचारास पाठबळ देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.गणी करणाऱ्यांमध्ये उपसरपंच रविशंकर तरोणे, सदस्य सखाराम जयलाल मडावी, प्रांताबाई ढेकवार, उर्मिला उपवंशी, अजयवंती उपवंशी, दुर्गाबाई ठकरेले, गीता नागपूरे यांचा समावेश आहे.