शनिवारपासून संपुर्ण जिल्हयात धान खरेदी सुरू करा-विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0
323

भंडारा दि.23 :  आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगाम 2020-21 साठी जिल्हयात मंजूर असलेल्या 84 धान खरेदी केंद्रावर शनिवार 24 ऑक्टोंबर 2020 पासून जिल्हयात सर्वत्र धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांचे धान वेळेवर घेणे अत्यंत गरजेचे असून शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, अशा स्पष्ट सुचना नाना पटोले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पुर्व तयारी बाबत आज आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मागिल वर्षी मंजूर असलेल्या जिल्हयातील सर्व धान केंद्रावर 24 ऑक्टोंबर पासून धान खरेदी सुरू करावी असे सांगुन नाना पटोले म्हणाले की, धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील व शासनाचे निकष पुर्ण करतील अशा संस्थांना धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे परवानगी देण्यात यावी. ही शेतकऱ्यांची योजना असून निकष पुर्ण करणाऱ्या प्रत्येक संस्थेला केंद्रा उघडण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी गाव तेथे धान खरेदी केंद्र उघडण्याची आवश्यकता पडल्यास  केंद्रास मंजूरी दयावी असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

धान खरेदी करतांना शेतकऱ्यांची लूट होता कामा नये. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट होत असल्याच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होत असून ही लुट थांबविण्यात यावी, अशा सुचना त्यांनी पणन विभागाला दिल्या. धान खरेदी केंद्र विभाजनाची कार्यवाही 15 दिवसात पुर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या असे त्यांनी सांगितले.

  नविन केंद्रांना परवानगी देतांना केंद्राला जोडण्यात येणाऱ्या गावांची सोय बघावी असे ते म्हणाले. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना जास्त अंतर जावे लागु नये या बाबीचे नियोजन करावे. निकष पुर्ण करणाऱ्या संस्थांना नविन केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात यावी ही प्रक्रिया 15 दिवसात पुर्ण करावी असे ते म्हणाले. या मुळे धान खरेदीत एकाधिकारशाही असलेल्या केंद्रांवर वचक निर्माण होईल व शेतकऱ्यांची लुट न होता धान विक्री सोईची होईल.

तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळवून द्या

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करावे तसेच तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पुर्व तयारी बाबत आज आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्हयात परतीच्या पावसाने 13 हजार शेतकऱ्यांचे 6 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृ‍षी विभागाचा नजर अंदाज आहे. सोबतच तुडतुडा व खोडकिडा रोगामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सुचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.