कोविड रुग्णाच्या प्रेतावरील दागिने गायब;महिलेच्या पतीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0
432

अर्जुनी मोरगाव– मोरगाव येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूपश्चातअंगावरील सोन्याचे दागिने परत करण्यात आले नाही.ते लंपास करण्यात आले की दागिन्यांसह अग्निसंस्कार करण्यात आले हे एक कोडेच आहे.मला दागिने परत करा अशी हाक बाधित महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
मोरगाव येथील एक गरोदर महिला १५ ऑक्टोबर रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती.तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते.त्या महिलेची कोरोना रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी गोंदियाला रेफर करण्यात आले होते.मात्र त्यादरम्यानच तिचा मृत्यू झाला.मृत्यूपश्चात आणखी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सुद्धा ती पॉझिटिव्ह आल्याचे समजते.ती मृत महिला कोरोनाबाधित असल्याची खात्री झाल्याने प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली.डॉक्टरांनी नगरपंचायत प्रशासनाला कळविले.तीन कर्मचारी आले व त्यांनी मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक तलावात प्रेत जाळण्यात आले.यावेळी मृतकाचे पती व नातेवाईक सुद्धा उपस्थित होते. काही दिवसांनी मृत महिलेच्या पतीला दागिन्यांची आठवण झाली. त्यांनी गुरुवारी दागिन्यांविषयी नगरपंचायत मध्ये चौकशी केली त्यांनी नकार दर्शवत ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता ते प्रेत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पॉलिथिन मध्ये गुंडाळल्याचे सांगून परत पाठविले. आता माझ्या पत्नीच्या मृतदेहावरील चार ग्राम सोन्याचे मंगळसूत्र गेले कुठे ? अशी तक्रार मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

अक्षम्य निष्काळजीपणा
कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंगावर दागिने असल्याची बाब प्रशासनाला कळलीच नाहीकाय ॽ नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रेत पॉलिथिन मध्ये गुंडाळले. हा आकस्मिक मृत्यू असल्याने पोलिसांनीही पंचनामा केला असेल.पोलिसांच्या पंचनाम्यात ही बाब कां आली नाही ? की कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी थातुरमातुर कारवाई करण्यात आली असावी अशी शंका उपस्थित केली जात आहे.याची चौकशी करून त्या महिलेच्या पतीला न्याय मिळतो का हे बघणे इष्ट ठरेल.