वाशिम, दि. २७ : जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद उत्सव मुस्लीम बांधवांकडून साजरा करण्यात येणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ३० ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई पोलीस अधिनियमचे कलम ३६ नुसार विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक अथवा जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल, अशा सर्व प्रसंगी अडथला होवू न देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये, घाटात किंवा घाटांवर, सर्व धक्यांवर व धक्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण करणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पत्रकात म्हटले आहे.