नागपूर दि. 05 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान
परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा
कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर
2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू
झाल्यासंदर्भात अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.
संजीव कुमार यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना गुरुवार,
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार
पुढीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम आहे.
5 नोव्हेंबर – निवडणुकीची अधिसूचना जारी करणे, 12 नोव्हेंबर –
नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अखेरचा दिनांक, 13 नोव्हेंबर –
नामनिर्देशनपत्राची छाननी, 17 नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा
अंतिम दिनांक, 1 डिसेंबर – सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान
करण्याचा कालावधी, 3 डिसेंबर- मतमोजणी, 7 डिसेंबर- निवडणूक प्रक्रिया
पूर्ण करण्याचा कालावधी आहे. यासंदर्भात आज नागपूर विभागातील नागपूर,
वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यातील
जिल्हा कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती
कार्यालय, नगरपंचायती व अन्य सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही अधिसूचना
दर्शनी भागात लावण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार
यांनी दिले आहेत.