वाशिम, दि. ०७ : कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी ‘अपेडा’ने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.
निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘अपेडा’ने विकसित केलेले फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीत स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ई-मेल आयडी आदी माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. राज्यातील फलोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील निर्यातक्षम बागांची नोंदणी ‘अपेडा’ने विकसित केलेल्या फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅपद्वारे करावी, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.