ब्रिजपालसिंग जानवीर गोंदिया झोनचे मुख्य अभियंता

0
20

गोंदिया दि.४: विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर व अमरावती या तीन नवीन झोन (परिमंडळ)ला महावितरणच्या वतीने गुरुवारी मुख्य अभियंता मिळाले आहेत. अधिकारी मिळाल्याने खर्‍या अर्थाने या कार्यालयाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. नागपूर ग्रामीण परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांच्याकडे नागपूर शहराच्या मुख्य अभियंतापदाची जबाबदारी मुख्य अभियंता मोहन झोडे सेवानवृत्त झाल्यावर दिली जाणार आहे. त्यांच्या चांगल्या कामाची ही पावती असल्याचे बोलले जाते.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महावितरणच्या गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या तीन नवीन झोनची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. या तिन्ही झोनकरिता महावितरणने गुरुवारी पदोन्नती किंवा बदलीने मुख्य अभियंता देण्याची घोषणा केली. त्यानुसार रास्तापेठ अर्बन सर्कल, पुणे येथे अधीक्षक अभियंतापदी असलेल्या अंकुर नाले यांना पदोन्नतीने चंद्रपूर झोनचे मुख्य अभियंतापद तर नागपूर क्वॉलिटी कंट्रोल झोनचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जानवीर यांना गोंदिया झोनचे मुख्य अभियंतापद देण्यात आले आहे. कोल्हापूर सर्कलचे अधीक्षक अभियंता दीपक कुंठेकर यांना अमरावती झोनच्या मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली असून गणेशखिंड सर्कल पुण्याचे अधीक्षक अभियंता भालचंद्र खंडाईत यांना मुंबईतील मुख्य अभियंता, कर्मशियल कॉर्पोरेट ऑफिस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकचे अधीक्षक अभियंता नागनाथ इरवडकर यांना बारामती येथील मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली.