पुणे -दि.४: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेतल्या जाणार्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च तर दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करता यावे या उद्देशाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच राज्य मंडळातर्फे वेळापत्रक जाहीर केले जात होते. मात्र, यंदा मार्च २0१५ मधील परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात आली.
त्यामुळे यंदा शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर राज्य मंडळाने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. परंतु, परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल.