घुग्घुस ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

0
13

घुग्घुस दि.8: येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम अविरोध तर उपसरपंचपदी संतोष नुने (काँग्रेस) विजयी झाले.
१७ सदस्य संख्या असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, रिपाइं, शिवसेना सर्मथित १0 तर भाजपचे सात सदस्य निवडून आले होते. सरपंचपद अनुसूचित जाती जमाती महिलेसाठी आरक्षित असून त्या प्रभागातून काँग्रेस पॅनलमधून पुष्पा मेश्राम निवडून आल्याने त्या या पदासाठी एकमात्र दावेदार होत्या. त्यामुळे पुष्पा मेश्राम यांची अविरोध निवड झाली. उपसरपंचपदाकरीता काँग्रेसकडून संतोष नुने, प्रकाश बोबडे तर भाजपतर्फे सिनु इसारफ यांनी नामांकन अर्ज दाखल केले. मात्र प्रकाश बोबडे यांनी नामांकन अर्ज मागे घेतले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे संतोष नुने यांनी भाजप उमेदवार सिनु इसराफ यांचा १0-७ ने भराव केला. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संतोष खांडरे, मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी दिलीप पिलई, वरिष्ठ लिपीक राजू येरणे यांनी काम पाहीले.
घुग्घूसपासून जवळच असलेल्या व नऊ सदस्य संख्या असलेल्या उसगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे नऊही सदस्य निवडून आल्याने सोमवारी सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक अविरोध झाली. त्यात सरपंचपद खुल्या प्रवर्गसाठी होते. या पदावर धनंजय ठाकरे तर उपसरपंचपदी माया जुमनाके यांची निवड करण्यात आली.