८१ शेतकऱ्यांचे ६ लक्ष ७० हजार रुपयांचे
कर्ज होणार माफ
गोंदिया,दि.१2 : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य सचिव पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक सुपे व तिरोडाचे सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते.
तिरोडा तालुक्यातील ८१ कर्जमाफीच्या प्रस्तावांची छाननी करुन या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. त्यानुसार संबंधित परवानाधारक सावकार हे कर्जदाराकडून घेतलेल्या तारण वस्तु परत करतील व नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सावकाराच्या खात्यावर रक्कम जमा होईल व यानंतर संबंधित कर्जदार शेतकऱ्यास कर्जमुक्ती झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले, कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव सावकारांनी सहायक निबंधक कार्यालयामध्ये त्वरित व प्राधान्याने सादर करावे, जेणेकरुन शेतकरी बांधवांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले की, कर्ज हे ३० नोव्हेंबर २०१४ पुर्वी घेतलेले असावे व ते योजनेचा लाभ होईपर्यंत थकीत असावे. कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्यांच्या कुटुंबातील एखादया व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास असे कर्ज व कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेस पात्र राहील. ज्या व्यक्तीने ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकार अधिनियम तरतूदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र राहणार नाही. परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेली पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाही. असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी कळविले आहे.