सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन
गोंदिया,दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीचे उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार असल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच स्वावलंबी करण्यात येईल. त्यामुळे निश्चितच विकासास चालना मिळेल असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
गोंदिया येथील मरारटोली भागातील नगर परिषद शाळेच्या परिसरात नागरी दलित सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष कशिश जायसवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, भाजपा शहराध्यक्ष भरत क्षत्रीय, नंदकुमार बिसेन, नगरसेवक सर्वश्री शोभा चौधरी, जितेंद्र पंचबुद्धे, राहुल यादव, महेंद्र उके, शिव शर्मा, प्रतिष्ठित नागरिक उमराव गडपायले, भाऊराव उके, हरी चौधरी व प्रदिपसिंह ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोंदिया नगर परिषदेला १७ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदिया शहरातील रमाई घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांची कामे वेगाने सुरु आहे. गोंदिया नगर पालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यामुळे विकासाच्या बाबतीत गोंदियाचा कायापालट झाल्याचे दिसून येईल असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेली लंडन येथील वास्तू खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. १२ वर्षापासून प्रलंबीत असलेला इंदू मिलच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गोंदिया येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त १ कोटी ५६ रुपयांच्या निधीतून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना याचा उपयोग होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक धनश्याम पानतावणे यांनी केले. उपस्थितांचे आभार नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ यांनी मानले. यावेळी मरारटोली परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.