आता दोन तासातच टी.बी.चे निदान होणार- नितीन गडकरी

0
15

नागपूर ,दि.१४: तंत्रज्ञान व नवीन संशोधनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मशीनद्वारे केवळ दोन तासातच टी.बी.चे निदान केले जाणार आहे. टी.बी.च्या प्रत्येक रूग्णांपर्यंत एसएमएस प्रणालीद्वारे पोहोचून त्यांना डॉटस औषधांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. शासनाने सुरू केलेल्या या योजनांचा लाभ रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातर्फे वर्धा मार्गावरील हॉटेल रेडीसन येथे रिवाईज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम व राष्ट्रीय आढावा बैठकीच्या उदघाटनाप्रसंगी श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी खासदार कृपाल तुमाने, केंद्रीय आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद, जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी डॉ. ए. श्रीनिवास, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती आय.ए. कुंदन, केंद्रीय आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील खापर्डे, आरोग्य सेवेचे सहसंचालक संजीव कांबळे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. संजय जैस्वाल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, के.एस. सचदेवा, डॉ. कोंडेश्वर तुमाने, डॉ. सौ. चहांदे आदी उपस्थित होते.

श्री.गडकरी यांच्या हस्ते टी.बी. रूग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या तीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात युनिव्हर्सल ॲक्सेस टु टी.बी. केअर, 99 डॉटस प्रकल्प, टी.बी. नेट मशीन या तीन योजनांचा समावेश आहे.

श्री. गडकरी म्हणाले, आधी टी.बी.चे निदान होण्यासाठी दोन महिण्यांचा कालावधी लागत असे, मात्र नवीन टी.बी. नेट मशीनद्वारे केवळ दोन तासातच निदान करणे शक्य आहे. टी.बी.सारख्या आजारातून जनतेला लवकरच मुक्त केले जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केले. सरकारी रूग्णालयात रूग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी शासकीय रूग्णालयांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारी डॉक्टरांनी गरीब रूग्णांविषयी मनात संवेदना ठेवून सकारात्मक दृष्टीकोण बाळगण्याची आवश्यकता आहे. जेनेरीक मेडीसीन मुळे गरिबांना औषध स्वस्त मिळू लागले आहे. मोठ्या आजारांसाठी असलेली महागडी औषधे लवकरच गरीब रूग्णांसाठी जेनेरीक औषधांच्या माध्यमातून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टी.बी. व सिकलसेल या आजारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. अनेक गावात आजच्या परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना शहराच्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे आरोग्य मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सेवेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

खासदार श्री.तुमाने म्हणाले, टी.बी. हा रोग भारत व विविध देशात वाढत चालला आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी सरकार व सामाजिक संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. सुरू केलेल्या या योजनांच्या माध्यमातून लवकरच पोलिओप्रमाणे टी.बी. हा आजारही भारत देशातून हद्दपार केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रसाद म्हणाले, टी.बी.ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप चांगले काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वार्षिक 30 टक्के उद्दिष्ट्ये ठरविले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने 50 टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण केल्याची बाब कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल डॉ. प्रसाद, डॉ. खापर्डे, डॉ. सचदेवा, डॉ. खत्री, डॉ. देवेश गुप्ता, डॉ. श्रीनिवास, डॉ. रोहीत सरीन, संजय देशमुख, नदीम खान, डॉ. चहांदे, डॉ. तुमाने, श्रीमती कुंदन, मोहन अभ्यंकर, डॉ. राम राजे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. कांबळे, डॉ. जैस्वाल, पुनीत दिवान, डॉ. सरनाईक, श्री. जोशी यांचा सत्कार करण्यात आला. आभार डॉ. कांबळे यांनी मानले.