उपराजधानी गाठणार ‘माईलस्टोन’-राष्ट्रपती मुखर्जी

0
35

नागपूर दि.१५:-: स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामदेखील नागपूरने केले आहे. हे शहर जरी ‘झीरोमाईल’चे असले तरी येणाऱ्या काळात विकासाचा ‘माईलस्टोन’ गाठण्यात नागपूरला यश येईल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरबाबत गौरवोद्गार काढले.

देशातील अनेक शहरांची ‘मेट्रो’ शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपूर शहरदेखील यात आघाडीवर आहे. रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादीबाबतीत नागपूर विकसित आहे. शहराशी संबंधित विविध योजना जर समन्वय ठेवून राबविल्या तर नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ हा लौकिक मिळविण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात नागपूर महानगरपालिकेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. १८६४ सालातील छोटे शहर ते आताचे महानगर असा विकास साधत असताना येथील महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळली नाही.

भविष्यातही जनकल्याणाच्या योजना राबवून या शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.पाऊण तास चाललेल्या या कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, समीर मेघे, नागो गाणार, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले.